सह्याद्रि कारखान्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; 'बेस्ट केन डेव्हलपमेंट'मध्ये तृतीय पुरस्कार
सह्याद्रिला 'बेस्ट केन डेव्हलपमेंट' पुरस्कार, ऊस विकासातील उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय पातळीवर दखल
सह्याद्रिला उच्च साखर उतारा क्षेत्रातील ऊस विकासासाठी तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार
रहिमतपूर दि 13प्रतिनिधी -
यशवंतनगर ता. कराड येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली या देश पातळीवर कार्य करणार्या संस्थेकडून सन 2024-25 मधील उच्च साखर उतारा क्षेत्रातील तृतीय क्रमांकाचा उत्कृष्ठ ऊस विकास पुरस्कार जाहिर झाला आहे, याबाबतचे पत्र नॅशनल फेडरेशन को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांचेकडून कारखान्यास नुकतेच प्राप्त झाले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री विश्वजीत शिंदे यांनी दिली.
श्री शिंदे पुढे म्हणाले, कारखान्याचे प्रेरक स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणसाहेब आणि संस्थापक आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कारखान्याचे चेअरमन व राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय श्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे कामकाज सुरू असून, कारखान्यास हा पुरस्कार सन २०२४-२५ च्या गळीत हंगामातील कामगिरीसाठी देण्यात येणार आहे. कारखान्याने सादर केलेल्या ऊस विकासासंबंधीच्या आकडेवारीचे तज्ज्ञांच्या (Award Selection Committee) समिती मार्फत मूल्यमापन करण्यात आले. भारत सरकारच्या Chief Director (Sugar) यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञ समितीने पुरस्कारासाठी निवड केली असून, आव्हानात्मक २०२४-२५ हंगामात सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याची कामगिरी उल्लेखनीय असल्याचे NFCSF ने पत्रात नमूद केले आहे.
कारखान्यास यापूर्वी देश व राज्य पातळीवरील शासन व विविध संस्थांमार्फत दिले जाणारे उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार, उच्चतम तांत्रिक क्षमता पुरस्कार, उत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार, आणि कारखाना परिसरामध्ये वृक्षारोपण केल्याने पर्यावरण पूरक कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाचा मानाचा वनश्री पुरस्कार असे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
नॅशनल फेडरेशनने ऊस विकास, ऊस उत्पादकता वाढ आणि उच्च साखर उतारा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली असून, कारखाना प्रशासन व ऊस उत्पादक सभासद, शेतकऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांना मिळालेला हा महत्त्वपूर्ण सन्मान असल्याचे श्री विश्वजीत शिंदे यांनी सांगितले.
दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता, नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, जनपथ येथे केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत, प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार संपन्न होणार आहे.
कारखान्यास हा पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, कारखान्याचे चेअरमन मा.श्री बाळासाहेब पाटील, व्हाईस चेअरमन कांतीलाल पाटील (तात्या) आणि सर्व संचालक मंडळ, अधिकारी-कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सोबत - सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचा फोटो

Post a Comment
0 Comments